Monday, 18 December 2023

सिटी बस

नुकताच पुण्यात गौरी गणपती निमित्ताने थोरल्या भावाच्या घरी गेलो होतो. तो रिटायर्ड होऊन तीन वर्षे झाली आणि मला दोन. मी वय वर्षे अठ्ठावनला रिटायर्ड झालो आणि तो साठीला. तिथे मला परांजपे बिल्डर यांच्या भुगांवमधील स्किम मध्ये घराबद्दल चौकशी करायची होती. तसं माझ्या मुलीने आधी सर्व फोनवर बोलणं केलं होत. परंतु मला प्रत्यक्ष पाहायला जायचं होतं. मी तिथे फोन केला आणि सर्व संदर्भ सांगितला. तसंच मला तिथं जाणं येणं खूप दुर पडेल म्हणून जाण्या-येण्याची तशी काही सोय आहे का ते विचारले. समोरून तशा प्रकारची सोय नाही परंतु तुम्ही वाघोली येथुन कोथरूडला आलात तर तिथुनच पिक अप ड्राप आउट शक्य आहे, पण नक्की तारीख आधीच ठरवावी लागेल असे सांगितले. मी दोन दिवसांनंतरची तारीख पक्की केली. तरीही घरापासून पिक अप होऊ शकेल का ते बघुया असे तिकडुन सांगितले गेले. संदीप नांव सेव्ह करून ठेवा असंही सांगितलं.
त्या दिवशी गणपती विसर्जन होते. दुपारच्या जेवणानंतर मी हिला म्हटलं "चल जाऊन येऊ. एवीतेवी पुण्यात आलोच आहोत तर एक काम आटोपून टाकु या. उद्या पुन्हा परत नागपूरला जायचं आहे. वेळ कमी आहे." 
पण जेवण आणि तेही सणासुदीच झाले की कुठे जाण्याची इच्छा होते का? तिला आणि मला दोघांनाही नकोस झाले होते. पण नाईलाज का नाम...
"आधी तुम्ही त्यांना फोन करून विचारा ना की पिक अप होईल का?" 
ही ने पळवाट शोधून चेंडू माझ्या कोर्टात ढकलला. हे कोर्ट न्यायालयीन नसुन टेनिस खेळाच असतं हे मला नुकतंच उमजलं आहे. 
"हो, विचारतो!" मी. 
 तरुण वयात मी गुलामअली ‌यांच्या गझलचा नुसता चाहता आणि एकता च नाही तर 'गाता' ही होतो. तसं आजही आहे, म्हणजे गुलाम अली यांच्या गझल आज सुद्धा गातो अधुनमधून. पण आता गुलामअली नाही तर गुलामी आली आहे.
मी फोन केला. मला सांगितले गेले की आज गणेश विसर्जनाचा दिवस आहे त्यामुळे सर्व कार चालक बिझी आहेत. "तुम्ही उंबर नाहीतर ओला वगैरे करून या म्हणजे सर्व स्किम दाखविण्यासाठी व्यवस्था करतो. आणि ड्राप आउट शक्य आहे का तेही पाहू."
मी उंबर बुक केली आणि आम्ही निघालो. तसा थोडा उशीर झाला होता. साधारण दुपारी साडेतीन वाजता निघालो ‌ एक तास लागणार होता, पण प्रत्यक्षात पावणे दोन तास लागले. हरकत नाही. कारणं वाटेत अनायासे शेकडो गणपतींच दर्शन झाले. काही विसर्जनाच्या वाटेवर, काही तयारीत तर काही आरामात स्थानापन्न झालेले. पुण्यात गणपती बाप्पा खुप बसतात. आम्ही मुक्कामी पोहचताच उबर सोडली. ड्रायव्हरला सांगितले की आम्हाला एक पाऊण तास काम आटोपून परत जायचं आहे. शक्य असेल तर थांबावे पण आग्रह नाही. 
नंतर आम्ही बिल्डरच्या ऑफिस मध्ये गेलो. संदीप ही व्यक्ती तोपर्यंत घरी गेलीं होती परंतु जे लोक तिथे हजर होते त्यांनी आवभगत केली. 
"आता सायंकाळ होते आहे तर आम्ही प्रत्यक्षात (घरं/अपार्टमेंट/प्लाॅट) बघुन घेतो. स्किम नंतर बघू. बाहेर अंधार होईल त्यामुळे बरोबर बघता येणार नाही नंतर" तीन सांगितले. 
जो कोणी मॅनेजर होता, आपण त्याला सचिन म्हंटले तरी चालेल, त्यानं काही वेळ विचार केला. सचिन, हो सचिनच म्हणु. नावात काय आहे? असं शेक्सपिअर म्हणून गेला. असो. 
"मॅडम बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण मी तुम्हाला जुजबी माहिती आगोदर देतो त्याशिवाय तुम्हाला स्किम काही नीट लक्षात येणार नाही. त्यानंतर आपण लगेच निघुयात. मी साईटवर जायला गाडी आताचं बोलवतो." सचिन.
तर सचिनने लागोलाग गाडीसाठी फोन केला. चहा घेणार की काॅफी हे विचारले आणि आणि त्यानुसार चहा बोलावला. एक भलीमोठी फाईल उघडली. दोन लाईट जास्तीचे चालू केले आणि एक ड्रांईग टेबलावर पसरवून आम्हाला थोडक्यात माहिती दिली. तेवढ्यात एक तरूण मुलीने आत येऊन "सर, गाडी आली आहे" असे सांगितले. लागोलाग चहा आला पण आम्ही तो स्कीप करत तसेच निघालो. आम्ही सचिनला संदीप सोबत आमचं काय बोलण झाले आहे ते सर्व सांगितले परंतु घाई गडबडीत परत जायची काय सोय आहे ते काही विचारले नाही. सचिनने आम्हाला साईट-सीईंग घडवलं आणि सर्व माहिती दिली. आम्ही पुन्हा ऑफिस मध्ये आलो. पुढे कसं जायचं, बुकिंग, फोन नंबर वगैरे सर्व माहिती घेतली. तेवढ्यात तिथे बसवलेल्या गणपतीची आरती झाली. आम्ही सहभागी झालो. मनोभावे दर्शन घेऊन प्रसाद घेतला.
"ठिक आहे सचिनजी, मी तुम्हाला कळवतो" मी म्हंटले.
"ठिक आहे." सचिन.
"सर, तुम्ही गाडी आणली असेल ना. तुम्ही रिटर्न कसं जाणार आहात?" सचिन.
"संदीपजींनी आम्हाला ड्राप ऑउटच म्हटलं होतं, तुम्ही तेवढी व्यवस्था केली तर बरं होईल" मी म्हटलं.
"नाही सर तसं आम्ही काही करत नाही. आणि त्यातून आज गाड्याही नाहीत. तुम्ही कोणाबरोबर बोललात त्यांनी कसं सांगितले ठाऊक नाही. तुम्ही त्यांच्याशीच एकदा बोलुन पहा" सचिन.
"मी त्यांना लावतोय फोन, पण फोन लागतं नाहीये." मी. 
"उबरही मिळते का पहातोय पण इथे रेंज मिळत नाहीयं" पुन्हा मी.
"तुम्हाला नंबर देतो, तुम्ही ट्राय करा." मी त्याला नंबर दिला.
त्यानं संदीपला फोन लावला. एकदा, दोनदा... संदीप पाटलाने बाॅब विलिसला एका षटकात जेवढं चौकार मारले तेवढ्या वेळा. परंतु प्रत्येक वेळी समोरुन एकच टेप वाजली. "जीस नंबरसे आप संपर्क करना चाहते हो.‌‌..."
शेवटी सचिन "गेट पर्यंत जाऊ आणि तीथुन बघु" असे म्हणत आम्हाला दोघांना घेऊन गेट जवळ मुख्य रस्त्यावर तेथील कारने आणता झाला. हे साधारण दिड ते दोन किलोमीटर बाहेर आहे. तेवढ्यात थोडा पाऊस मचमच करायला लागला. इथं ही मला रेंज मिळत नव्हतीच.
सचिन आणि त्यांच्या ड्रायव्हरने एक दोन ऑटोरिक्षा थांबवायचा प्रयत्न केला पण कोणी दाद दिली नाही. "सर तुमच्या उबर ऍपवर ट्राय करून पहा! इथे मिळेल! "
"नाही ना! मी बघतोच आहे मघापासून. फक्त कर्सरच येराझाऱ्या घालतोय, प्राॅपर रेंज नाहीये इथेही."
"तुम्हाला सिटी बस चालेल का?" ड्रायव्हर.
"न चालायला काय झालं! पण जातात का इकडून?"
"चिक्कार! दर पाच मिनिटांनी गाडी जाते! " सचिन.
 "आपण इथेच उभं राहु. हा स्टाॅपच आहे "
दहा मिनिटे गेली. एक गाडी येताना दिसली. सचिनने दुरूनच पाटी वाचली.
"सर ही चालतेय तुम्हाला. पुढे चांदनी चौकात सोडा बस. तिथुन उबर किंवा ऑटोरिक्षा मिळते लवकर"
"धन्यवाद!" आम्ही लगेच गाडीत बसलो. कितीतरी दिवसांनी सिटी बस मध्ये बसलो होतो.
"तिकीट बोला!" तेच जुन्या ओळखीचे, परवलीचे शब्द. 
"कुठं पर्यंत जाईल बस?"
"समोर बघा! स्वारगेट पाटी लागलीयं!, तुम्हाला बोला कुठे जायचंय?" तीच लय तोच स्वर. कित्येक वर्षे झाली एकुन. स्वत:ची गाडी घेतली त्यानंतर बहुतेक पहिल्यांदाच.
"दोन स्वारगेट द्या" मी विचार केला, बस आपल्याला हव्या त्या दिशेने जाते आहे तर जास्तीत जास्त अंतर पार करू. बाहेर पाऊस लय धरतो की काय असे वाटत होते. मी पुण्याला बरेचवेळा गेलोय आणि हिंडलो आहे. पण पॅसीव्हली. त्यामुळे तेवढी माहिती नाही. मी कंडक्टरला सांगितले की आम्हाला वाघोलीला जायचं आहे. विचारले कुठे उतरणं सोईस्कर होईल.
"आधीs बोलायचंत नाss! स्वारगेट कशापायी उलट जातायं? डेक्कनला उतरा!"
"मास्तर सांगा मला डेक्कन आलं की " मी.
मास्तरांनी मानेनच "हो" म्हटलं. माझ्या समोरच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीनं सांगितले की तो डेक्कनलाच उतरणार आहे. 
"माझ्या पाठी उतरा!" तो.
ही बस पुर्वी होत्या तशी लालगाडी सारखी नव्हती. सीट्स सुद्धा खाली वर अशा होत्या. ती समोर लेडीज सीटवर बसली तर माझ्या बाजुची खिडकी जवळील सीट रिकामी!. बस मध्ये जागा थोड्याफार उपलब्ध दिसत होत्या. बाहेर पाऊस पडत होता. बारीक पण हेकेखोर. पुढल्या एका थांब्यावर एक जाडजूड मध्यमवर्गीय स्त्री चढली. बरोबर माझ्या सीटपाशी थांबली. तोंडानं "थोडं सरकाकी" म्हणत कबंरेनेच मला खिडकी कडे सरका म्हणून सुचवत होती. त्या साइडला खिडकीतून पाणी ठिबकत होते. मनात म्हटलं "व्वा रे शहाणी! मी का बसु प तुझ्यासाठी पाण्यात!"
"तुम्ही व्हा आत! मला पुढे उतरायचंच आहे " मी उघडपणे सांगितले. ती चतुर स्त्री समोर जाऊन एका जागेवर बसली. 
चांदणी चौक आला तसं गाडी रेंगाळत पुढे जाऊ लागली. बाहेर तसलाच पाऊस पण गर्दी तुफान! कार, बसेस, ट्रक आणि त्यांच्या मध्ये दुचाकी वाहने आणि पायदळ!. रेनकोट घालून, छत्री घेऊन!. मला आठवलं की नुकताच इथे एक पुल तोडलाय कारण त्यामुळे वाहतूक कोंडी होत होती म्हणे!. शेजारी लोक बोलत होते काही त्रास कमी नाही झालाय. तेवढाच वेळ लागतोय. खूप ठिकाणी ओव्हर ब्रीज बांधले आहेत. 
मनात विचार आला की "ओव्हर ब्रीज एक समृद्ध अडगळ" अशी कादंबरी लिहु पुढे कधीतरी. का तुम्ही लिहीता? त्यातच अवघड कांहीच नाही. आणि मी लिहितो म्हटलं तरी मी कोण प्रतिथयश लेखक आहे? आता पुलं, वपु, द. मा. मिरासदार, शिवाजी सावंत असे मोठे लोक नाहीत किंवा निदान लिहीत नाहीत म्हणून तुम्ही माझं लिहीलेले वाचता तरी आहात. (इथपर्यंत वाचत आला आहात असे समजून!). नाहीतर माझं हे समृद्ध लिखाण तुम्ही केव्हाच अडगळीत फेकल असतं.
चांदणी चौक पार केला आणि बस ऱंगात आली. लहानपणी मी आणि मोठा भाऊ हैद्राबादला टॅंन्कबंध रोड पासून मोंढ्यापर्यंत डबलडेकर मध्ये बसून शाळेत जायचो. त्यावेळी सुद्धा बस डौलाने चालू लागली की मला एकाचवेळी सुखदुःख व्हायचे. पैकी सुख गाडी वेगात चालली असल्याने तर दु:ख शाळा जवळ येऊन बसमधून लवकर उतरावे लागेल या विचाराने.
पालिकेला पोहचण्या आगोदर बस कुठेतरी गॅस भरायला थांबणार होती.
"चला उतरून घ्या सगळ्यांनी!. गाडी मध्ये जाणारय गॅस भरायला!" मास्तरांनी गर्जना केली. 
नाशिक पुण्यात बस वर, खाली, मध्ये कशी जाते समजतच नाही. मागे, तरुणपणी मी नाशिक जवळ ओझरला, एचएएल वसाहतीत बहीण कडे जायचो कधीकधी. तिथे ओझर गावातुन सिटी बस यायची आणि वसाहतीच्या एका टोकाला जाऊन परतायची. मध्ये एका स्टाॅपवर मी ओझरला परत यायला बस पकडायचो. तिथे उभं राहून वाट पाहत असतांना कोणी तरी यायचं आणि विचारायचं "दादा, बस वर गेली का?" 'वर' म्हणजे वसाहतीच्या टोकाला आणि 'खाली' म्हणजे ओझर गावाकडे हे नंतर मला समजले. नाहीतर माझी समजूत अशीच आहे कि बस इकडे किंवा तिकडे जाते. वर जायला, खाली जायला ती काय एअरबस आहे? की मिग विमान? ओझर झालं म्हणून काय झालं!
सगळेच उतरले तसं आम्ही उतरलो. हीला आणि मलाही हे सर्व नवीन होते. तसं तर तीला एकुणच हा बस प्रवास विचित्र वाटत होता.
 "आपण का उतरलो इथं? आपल्याला डेक्कनला उतरायचं होतं ना?" बहुतेक तीच्या कानावर मास्तरांचे बोल किंवा इतर कुजबुज पडली नसावी. "अगं तु एकलं नाही का? गाडी गॅस भरायला गेलीय. पुन्हा येईल. बसु तोपर्यंत"
"इथं कुठं बसणार ओल्या जागेवर! तुम्हीचं बसा!" एक बाई तीच्या ह्यांना म्हणाली. 
थोडी कोरडी जागा पाहून मी ही एका कट्ट्यावर बसलो. ही मात्र उभीच राहिली. पावसाचा तमाशा चालूच होता. तुरळक पण लक्षवेधी.सध्या डोक्यावर मात्र पडतं नव्हता इतकंच.
"यांना आत्ताच का सुचलं गॅस ठ्यास भरणं, एकदा डेक्कनला तर येऊ द्यायची" ती वैतागुन मला म्हणाली. "बर आपण का उतरायचं. भरू दे जेवढा गॅस भरायचाय तो."
"अगं जर गॅस भरतांना धमाका झाला तर!. प्रिकाॅशन म्हणून उतरवत असतील आपल्याला. "
"म्हणजे प्रवाशांच्या सोयीसाठी नाही पण जीवासाठी" मी तिला समजावून पाहीलं. तसा मी तरी कोण एक्स्पर्ट आहे या बाबतीत.
बस पुन्हा येईन म्हणाली होती तशी आली थोड्या वेळात. पुन्हा आम्ही बसलो. प्रवासी आता कमी राहिले होते. पावसाचा तमाशा भैरवी म्हणणार असे वाटत होते.
पुढे डेक्कनला मास्तरांनी आठवण ठेवून सुचना केली
"चलाss! डेक्कन वाले उतरुन घ्या!, गाडी जास्त थांबणार नाही रस्त्यावर!" गाडी रस्त्याच्या कडेला लागली आणि आम्ही उतरलो. पाऊस थेंब थेंब अभिषेक करत होता. 
तिथे वाघोली मिळेल का असं विचारलं? तर तिथं उपस्थित असलेल्या एका प्रवाशानी सुचवलं 
"इथे अवघड आहे, त्यापेक्षा रेल्वे स्टेशनला जावा, तिथं पाहिजे तेवढ्या भेटायलात बघा वाघोली!" बहुतेक बाहेर गावाचा दिसतोय. पुण्यात भाषा कशी शुद्ध, शुद्ध!
"पाहिजे तेवढ्या कशाला एकच पुरे आहे मला आणि हिला मिळुन" मी मनात म्हटलं. आणि उघडपणे विचारले
"स्टेशनला जायला आहे ना फ्रिक्वेन्सी?"
" हि आली बघा चढुन जा तुम्ही"
त्या गाडीत चढलो. गर्दी होती. मी इथे उभं असताना उबर मिळते का पाहिले होते. रेंज मिळत होती त्यामुळे उंबरच ऍप पिक अप लोकेशन विचारत होत. मी सर्व डिस्कार्ड केलं. या गाडीत बसायला जागा नव्हती. उभ्याने प्रवास करावा लागला. जवळ जायचं होतं म्हणून ठिक आहे. तेवढ्यातही तीने डोळ्यानेच तक्रार केली. "पुन्हा घ्या तर सिटी बसच नांव, मी पाहते मगं!" मी तीच्या डोळ्यात तक्रारीचा मजकूर वाचला. घरी पोहचेपर्यंत काही तरी सोल्युशन काढावंच लागणार.
सहजच मी एका सहप्रवासी व्यक्तीस विचारलं " वाघोली मिळेल ना दादा स्टेशनला?"
"स्टेशनला कशापायी जाताय? इथं समोर उतरा महानगर पालिकेला. तिथं तुम्हाला वाघोली मिळेल आणि बस मध्ये जागाही मिळेल. स्टेशनला जाल तर जागा नाही मिळणार!"
बाहेर थोड्या पाऊसाची संगत होतीच. तो (पाऊस) बहुतेक घरापर्यंत साथ देणार असं दिसतंय. पालिकेचा स्टाॅप म्हणजे एक झाड आणि दोन तीन विनंती थांबे. तीची कुरकुर वाढली होती.
एक तर सत्रा वेळा बस बदलणं, त्यावर पावसाचा हबका. बरोबरच होते ते, पण...
"सरळ गेलो असतो स्टेशनला आणि तेथुन ओला उबर केली असती, आपण इथे (पुण्यात ) आलो त्यादिवशी सारखी"
"बस आता एकदाचं बस आली की बस! मगं थेट घराजवळच उतरायचंय!" मी कसंतरी समजावलं. 
तिथे एक जण म्हणाला पुढे थांबते वाघोली. समोर चला. तिथे जवळ जवळच दोन तीन विनंती थांबे आहेत. आम्ही समोर गेलो. 
एक न्युयली मॅरीड कपल होते. ती मुलगी हीला म्हणाली "काकी, तुम्हाला वाघोलीलाच जगायचंय ना, आम्हीही तिकडेच जातोय, बस आली की तुम्ही आमच्या मागोमाग या! कुठं उतरणार तुम्ही वाघोलीला." तीनं विचारले.
"कागss आम्हाला बैफ रोडला जायचं आहे, कुठे उतरावं लागेल?" हिन विचारलं.
 तीला पण ते माहीत नसावं. घुटमळत होती. तेवढ्यात एकानं सांगितले "व्याघेश्वर मंदिराला उतरा तिथुन जवळ पडेल!" पुण्यात सहकार्य अजूनही चांगलेच आहे.
"आहो, हे दुसरंच मंदिर म्हणतात आहेत. एकलं का?"
"तेच ते! मी तुला मगाशी म्हटलं ना! तेच "
खरं तर मी मगाशी अंकलेश्वर म्हणालो होतो, मला आठवलं. खूप वर्ष चंद्रपुरात राहिलो त्याचा परिणाम! माझी एखादी सीली मिस्टेक किंवा ओव्हर साईट मनात एव्हढी रेड मार्क करून का बाळगायची? सवयच झाली आहे चुका शोधण्याची. तसं व्याघेश्वर काय आणि अंकलेश्वर काय परमेश्वर एकच आहे. काय युक्तिवाद आहे माझ्या मनाचा मनातच. "पण बस थांबे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत महाराज!" मनातलाच लीडर ऑफ अपोझीशन बोलला. जाऊदे.
एक वाहक तीथेच तिकीटं देत होता. दोन तिकिटं काढून घेतली. गाडी आली आणि आत प्रवेश केला. गाडी मध्ये गर्दी होती. पुढे फक्त स्त्रियांसाठी असलेल्या सीटवर एक गृहस्थ बसले होते. हिला म्हटलं पुढे चलं. "अहो दादा लेडीजला बसु द्या की!" मी त्याला म्हटलं. जीवावर येऊन कसं तरी त्यांनी जागा सोडली. मग हिला सीट मिळाली, मी उभाच होतो. हातात काही बॅग वगैरे नसलं तरी पायातही त्राण नव्हता. 
तेवढ्यात बाजुच्या सीटवरून एक मुलगा मला म्हणाला " काका बसा तुम्ही!"
मी म्हटलं "राहु दे! राहु दे! ठिक आहे मी उभाच" खरं तर उभं राहायला नको वाटतं होतं.
"अहोss! बसाकी! उतरायचंय मला पुढच्याला!" असं बोलून तो एक पिशवी घेऊन उठलाचं. 
मी बसलो. व्वा! सीटही मिळाली!. आता एकच ध्येय, व्याघेश्वर! आज सकाळी टिव्ही चॅनल वर माझ्या राशीच भविष्य एकत होतो. गंमत म्हणून! आज गोचर राहु तुमच्या राशीवर मेहरबान होणार आहे. तुम्ही फक्त प्रकटपणे याचना करा. घबाड मिळण्याचे योग आहेत. झाले तसेच. मी त्या मुलाला "राहु दे! राहु दे!" म्हटलं ते गोचर राहुने एकलं. ही सीट मिळाली म्हणजे घबाडच आहे या गर्दीत. बसतो कधी कधी ग्रह ज्योतिषावर विश्वास! फक्त आरामात बसून विचार करायला हवा.
रेल्वे स्टेशनला सोडून बराच वेळ झाला. एव्हाना पावसाने आमचा नाद सोडला. बरंच अंतर आहे व्याघेश्वर पर्यंत. शेवटी आलं एकदाच व्याघेश्वर. उतरलो दोघं. हा रस्ता ओलांडला की हाकेच्या अंतरावर भावाचा फ्लॅट आहे. वाहनांची गर्दी खूप असल्याने रस्ता ओलांडायला वेळ लागला. गणपती विसर्जनाचा दिवस. त्यात पुणे. पुणे तिथे काय उणे रे!पायीच निघालो. पाऊस पडून गेल्याने रस्ता ओला झालेला. वेळ सुमारे साडेनऊ दहा. वाटेत गरम गरम वडापाव खाल्ला, थोडा बांधुन घेतला. हा वडापाव तीच्या आजच्या महेनतीचा मेहेताना! आणि पुढच्या माझ्या एडव्हेंचरसाठी ऎडव्हान्स. बोलता बोलता घरं गाठलं. 
भावाने विचारले "कारे खुप वेळ लागला तुम्हाला? कसं आलात? उबर की ओला?"
"ओल्याने" मी नरोवा कुंजरोवा केलं. थोडा ओला झालोच होतो. माझ्या डोक्यावर पाऊस थुईथुई नाचल्याने केंस भन्नाट झाले होते. माझी नातं, सव्वा वर्षांची त्याकडे कुतूहलाने पाहत होती. आम्ही फ्रेश होऊन जेवण केले गप्पा मारत बसलो. सर्व काही सांगितले. आमचं द्रविडी प्राणायाम एकुन ते अवाक् झाले.
"अरे तू फोन का नाही उचलत! मी दोन तीन वेळा ट्राय केला तुला!" भाऊ.
"मला एकदा ही रिंग एकु आली नाही." मी.
"अरे तिकडे रेंज अजिबात नाहीये. पुण्यात आल्यावर माझा मोबाईल खिशात होता पॅ़ंन्टच्या आणि तीचा पर्समध्ये." मी पुन्हा.
"अहो पण बसने का आलेत भाऊजी? हे आले असते ना गाडी घेऊन?" वहिनी.
"कशाला? त्याच कॅटरेक्टच ऑपरेशन झालंय आत्ताच." मी.
"तसंही मला हे करायचं होतंच एकदा. जुन्या बॅटरीची कॅपॅसिटी टेस्ट करायलाच हवी अधुनमधून. माझ्यामुळे तिला, तुम्हाला सर्वांना त्रास झाला हे खरंय. पण‌..."
"आम्हाला कसला त्रास!, पण उद्या तुम्हाला जायचही आहे परत नागपूरला " माझं वाक्य मध्येच तोडत थोरला भाऊ म्हणाला.
त्यानंतर झोपण्यापूर्वी बराच वेळ गप्पा मारल्या. परांजपे स्किम बद्दल, गणपती विसर्जनाच्या, जुन्या नवीन आठवणींच्या आणि बरंच काही. मी, ही, वहिनी, भाऊ, माझा पुतण्या, सून आणि हो!, छोटी. बोलता बोलता केव्हा झोप लागली कळलंच नाही.
मित्रांनो, तुम्ही सुद्धा कधीतरी सिटी बस प्रवास करून पहा. मज्जा येईल. आपली स्वतःची गाडी, उबर ओला नेहमीचेच झाले. नाहीतरी उबर ओला बुक केली, किंवा गाडी काढली, गेलो आणि आलो ही काय सांगण्यासारखी गोष्ट होईल का?
-मिलींद नातु